प्रतिनीधी – भूषण पवार
शिंदखेडा : – तालुक्यात व परिसरातील वृक्षतोडीचे प्रमाण हे दिवसे- दिवस वाढले असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात वृक्षतोड जर थांबली नाही तर येणारा काळ शिंदखेडा तालुक्यासाठी भयावह असणार यात शंका नाही.दिवसेंदिवस वृक्षांवर चालणाऱ्या आरांमुळे उष्णतेचा पारा चढला आहे.एकीकडे उष्णतेची प्रचंड लाट असून दुसरीकडे बेकायदेशीर वृक्षतोड होत आहे.आज तालुक्याची अवस्था वृक्षतोडीमुळे दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.वातावरणाचा तोल ढळत आहे.शिंदखेडा तालुक्यात प्रचंड प्रमाणात वाढलेल्या वृक्षतोडीमुळे तालुक्यात उष्णतेचा पारा अजून वाढणार की काय,यामुळे जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.आज वृक्षतोडीचे दुष्परिणाम निर्माण झाले आहेत.बेसुमार वृक्षतोडीमुळे जंगल नाहीसे होत आहेत त्यामुळे प्राणीही बेघर झाले आहेत आणि ते मानवी वस्त्यांमध्ये आसरा शोधत आहेत.आज अनेक ठिकाणी मानवी वस्त्यांत बिबट्या घुसल्याच्या घटना घडत आहेत.
वने ही राष्ट्रीय संपत्ती आहे ते खनिज संपत्तीप्रमाणे ओहोटीस लागणारे धन नाही.म्हणूनच सरकारने वनमहोत्सव हा राष्ट्रीय सण मानलेला आहे.सामाजिक वनीकरणाच्या मोहिमेखाली वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन व वृक्षसंरक्षणासाठी कसून प्रयत्न होत आहेत.परंतु शिंदखेडा तालुक्यात या उलट चित्र बघण्यास मिळत आहे.तालुक्यातील काही आरा गिरणीत बिनधास्तपणे निम जातीच्या लाकडाची तस्करी सुरू आहे.याकडे वनविभाग सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याची चर्चा जनतेतून होत आहे.वृक्षतोडीमुळे तापमानात वाढ होत आहे त्यामुळे बाष्पिभवनाचे प्रमाण वाढत आहे परंतु पाऊस मात्र त्या प्रमाणात होत नाही म्हणून जमिनीवर पाण्याचे साठे आणि भूगर्भातील पाणी पातळी वाढत नाही ह्या समस्या आज निर्माण झाल्या आहेत.या सर्व गोष्टींचा विचार करून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि सर्व लोकांना जंगलाचे महत्त्व समजावे म्हणून प्रशासनाने याकडे लवकर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. शिंदखेडा तालुक्यात याप्रमाणेच वृक्षतोड चालू राहिली तर तालुक्यातील वृक्षप्रेमी लवकरच या बेकायदेशीर वृक्षतोडी विरोधात मोठे आंदोलन उभे करतील अशी चर्चा आहे.
जे त्यागाच्या भावनेने स्वत: उन्हात उभे राहतात, पण इतरांना सावली देतात ज्यांची फळे-फुलेही दुसर्यांसाठीच असतात,असे त्यागमय जीवन जगणारे वृक्ष एखाद्या सत्पुरुषासारखेच भासतात.संत तुकाराम म्हणतात,वृक्षवल्ली आम्हा सोयरे, सामान्य माणूसही नेहमीच्या दगदगीपासून दूर जाण्यासाठी,हवापालटासाठी थंड हवेच्या ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यातच जातो.अशा या उपकारकर्त्या वृक्षांचा या लाकूड तस्करांमुळे तसेच आरा गिरणी चालकांमुळे ऱ्हास होत आहे हे नक्कीच.