✍️✍️🚥🚥✍️✍️


धुळे : – आगामी दिवसांमध्ये वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा त्रास वाढण्याची शक्यता आहे. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी सर्व विभागांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिनव गोयल यांनी दिले.
उष्माघातापासून खबरदारी बाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृह येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, मनपा अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, पोलीस उपअधिक्षक शिल्पा पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके, तहसीलदार (शिंदखेडा) ज्ञानेश्वर सपकाळे, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक क.तो.झोपे, मुख्याधिकारी (साक्री) दीपक पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे, अपर तहसीलदार (पिंपळनेर) दत्ता शेजुळ, वनक्षेत्र अधिकारी श्री. वाघ, एसडीआरएफचे पोलीस निरीक्षक श्री.सोनवणे, पोलीस निरीक्षक श्री.सपकाळ, अग्निशमन विभागाचे अतुल पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. गोयल म्हणाले की, 27 ते 30 मार्च, 2024 दरम्यान हवामान विभागाकडून उष्णतेत वाढ होण्याचा इशारा दिला आहे. त्याअनुषंगाने सर्व विभागांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. सर्व आरोग्य उपकेंद्रात तसेच शासकीय दवाखान्यात उष्माघात कक्ष कार्यान्वित करावा. दवाखान्यात पुरेसा औषधसाठा उपलब्ध करुन ठेवावा. आरोग्य विभागातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उष्माघात काळात करावयाच्या कार्यवाहीचे प्रशिक्षण देण्यात यावेत. सर्व दवाखाने, इमारतींचे आग सुरक्षा परिक्षण (फायर ऑडिट) करुन घ्यावे. भट्टीशी संबंधित कारखाने, व्यवसाय करणाऱ्या कामगारांच्या कामाचे नियोजन करावे. त्यांच्यासाठी पुरेसे पिण्याचे पाण्याची व्यवस्था करावी. रेल्वे, बस स्थानकांच्या ठिकाणी, पिण्याचे पाणी, प्रथमोपचार सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. मनरेगा, नरेगा अंतर्गत मजुरांना सोयीनुसार सकाळ व संध्याकाळच्या सत्रात कामाचे नियोजन करावे. उष्माघाताच्या वेळी घ्यावयाची काळजी याविषयी ग्रामीण व शहरी भागात जनजागृती करावी. 24 तास हेल्पलाईन व नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवावा.
त्याचबरोबर पशुसंवर्धन विभागाने उन्हाळयात पशुधनाची काळजी घेण्याच्या उपाययोजनांबाबत जनजागृती करावी. वन विभागाने वन्य प्राण्यांसाठी पाणवठे निर्माण करावे, त्याचबरोबर वणवा प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात. सर्व शासकीय कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. त्याचबरोबर शहरी तसेच ग्रामीण भाग, शासकीय कार्यालय, बगीचा, पशु तसेच पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, उष्माघाताच्या दृष्टीने सुरक्षा उपाय म्हणून शालेय विद्यार्थ्यांच्या शाळेच्या बाबत, शाळेत पुरेसे पाणी उपलब्धतेबाबत आवश्यक योजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. जितेंद्र सोनवणे यांनी पीपीटीद्वारे माहिती दिली. बैठकीस विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.