spot_img
spot_img

तापीची लूट थांबवा! वरपाडेतील वाळू ठेक्यावर ग्रामस्थांचा संतापाचा स्फोट

वरपाडे – तापी नदीतील वाळू ठेक्याला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

लिलाव प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्याची तहसीलदारांकडे मागणी

प्रतिनिधी _ भूषण पवार

शिंदखेडा : – तालुक्यातील वरपाडे शिवारातील तापी नदी पात्रातील वाळू उपसा ठेका देण्याच्या प्रक्रियेला वरपाडे व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. याबाबत ग्रामस्थांनी दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी तहसीलदार शिंदखेडा यांच्याकडे सविनय निवेदन सादर करून सदर वाळू घाट लिलाव प्रक्रिया तात्काळ स्थगित करून रद्द करण्याची मागणी केली आहे.ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, मागील दहा वर्षांत तापी नदीतील विविध ठिकाणी एकूण सोळा वेळा वाळू उपसा ठेके देण्यात आले असून त्यातून वारेमाप उत्खनन झाले आहे. त्यामुळे तापी काठावरील गावांना भविष्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.सन 2017- 18 मध्ये वरपाडे गावाला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. मात्र शासनाच्या धोरणानुसार नदीकाठचे गाव टंचाईग्रस्त यादीत नसल्याने टँकर उपलब्ध करून देण्यास तत्कालीन तहसीलदारांनी असमर्थता दर्शविली होती, असे ग्रामस्थांनी नमूद केले.वरपाडे व पंचक्रोशीतील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती असून तापी नदी पात्रातील व भूगर्भातील पाण्यावर बागायती शेती अवलंबून आहे. जर वाळू उपसा ठेका दिल्यास पाण्याची पातळी खालावून शेतीचे मोठे नुकसान होईल, तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक जीवन उद्ध्वस्त होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठेका देण्यास एकमुखी विरोध दर्शवून ठराव शासन दरबारी पाठविला आहे. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 18 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या जनसुनावणीतही ग्रामस्थांनी पर्यावरणीय हानीबाबत लेखी हरकत नोंदविली होती.ग्रामस्थांनी सांगितले की, काळ्या जमिनीच्या भौगोलिक परिस्थितीमुळे परिसरात पूर्वी रस्त्यांची गंभीर समस्या होती. त्यातून आरोग्याच्या गंभीर समस्याही निर्माण झाल्या असून अशा स्थितीत पुन्हा पर्यावरणीय संकट निर्माण होऊ नये, यासाठी ठेका रद्द करावा.ग्रामस्थांनी प्रशासनाला कळकळीची विनंती करत स्पष्ट इशारा दिला आहे की, जर वाळू घाट लिलाव प्रक्रिया रद्द झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.यावेळी वसंत पाटील,रामराव पवार,दिपक पवार, नथु पवार, प्रविण गिरासे,दगडू पाटील ज्ञानेश्वर खैरनार रमेश मोरे सचिन पवार जयवंत पवार कुणाल गिरासे विशाल जाधव प्रकाश पवार करणकोडी समाधान कोडी साहेबराव पवार नंदलाल पवार प्रदीप चित्ते मके सिंग गिरासे भागवत जाधव विजय पवार व वरपाडे ग्रामस्थ उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!