प्रभाग क्रमांक ९ मधील गटारींच्या समस्यांची नगराध्यक्ष कलावती माळी यांची प्रत्यक्ष पाहणी
शिंदखेडा प्रतिनिधी
शिंदखेडा : , शिंदखेडा नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ९ (बी. के. देसले नगर) येथे गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या गटारींच्या समस्यांची लोकनियुक्त नगराध्यक्ष कलावती माळी यांनी गुरुवार, दि. १३ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी मुख्य अधिकारी श्रीकांत फागणेकर, आरोग्य विभागाचे राजेंद्र चौधरी, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता विशाल साळुंखे यांच्यासह स्थानिक रहिवासी उपस्थित होते.
मार्च २०२४ पासून सुरू असलेले गटारीचे काम वर्षभर उलटूनही पूर्ण न झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक घरांच्या कंपाऊंडमध्ये गटारीचे पाणी रिटर्न येत असल्याने दुर्गंधी, अस्वच्छता आणि आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.
पाहणीदरम्यान श्रीमती सुनीता सोनवणे यांनी त्यांच्या घराच्या वॉल कंपाऊंडमध्ये गटारीचे पाणी शिरत असल्याचे निदर्शनास आणून दिले. अतुल पाटील यांनी त्यांच्या घरासमोरील बाल कंपाऊंडमध्ये साचणाऱ्या पाण्याची समस्या मांडली. शोभा पवार यांच्यासह इतर महिलांनीही वारंवार तक्रारी करूनही समस्या न सुटल्याची खंत व्यक्त केली.
परिसरातील दिलीप बापू गुरुजी, डॉ. चव्हाण, सेवानिवृत्त सैनिक परदेशी, प्रा. प्रदीप दीक्षित, भामरे मॅडम, जाधव मॅडम यांसह अनेक नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
मुख्य अधिकारी श्रीकांत फागणेकर यांनी प्रत्यक्ष पाहणीनंतर जुन्या गटारीतील साचलेला गाळ तातडीने काढून पाणी सुरळीत मार्गस्थ करण्याचे आश्वासन दिले. तसेच प्रलंबित कामे लवकर पूर्ण करून नागरिकांना दिलासा देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
नगराध्यक्ष कलावती माळी यांनीही संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देत नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचे निर्देश दिले. नागरिकांनी यावेळी प्रशासनाकडून ठोस आणि त्वरित कारवाईची अपेक्षा व्यक्त केली.







