प्रभाग क्रमांक ८ मधील गटार तुंबल्याने संतापाचा उद्रेक — नागरिकांच्या आरोग्याशी सुरू आहे थेट खेळ!
शिंदखेडा : शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात गटार तुंबून दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून स्थानिक प्रशासनाचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. अनेक दिवसांपासून गटार साफसफाई न झाल्याने सांडपाणी रस्त्यावर साचले असून नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
परिसरातील रहिवाशांनी वारंवार तक्रारी करूनही नगरपरिषद प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. “तक्रारी करायच्या, निवेदने द्यायची, फोटो पाठवायचे — पण प्रशासन झोपेतच!” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
सार्वजनिक बोअरही अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असून पाणीटंचाईचा फटका नागरिकांना बसत आहे. एकीकडे गटाराचे सांडपाणी आणि दुसरीकडे पिण्याच्या पाण्याची गैरसोय — या दुहेरी संकटात नागरिक भरडले जात आहेत.
या प्रकरणी नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून त्वरित साफसफाई व दुरुस्तीचे आदेश दिल्याचे सांगितले जात असले तरी नागरिकांचा सवाल स्पष्ट आहे — कारवाई कधी दिसणार?
जोपर्यंत प्रत्यक्ष काम सुरू होत नाही, तोपर्यंत आश्वासनांची कागदी घोडदौड थांबवून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी ठाम मागणी आता जोर धरत आहे.







