- शिंदखेडा तालुक्यातील संगणक परिचालकांच्या मानधनाचा प्रश्न ऐरणीवर
नामदार जयकुमार रावल यांची तात्काळ दखल; जिल्हा परिषद सीईओंना फोनवरून सूचना
शिंदखेडा : ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या रखडलेल्या मानधनाचा प्रश्न अखेर राज्य पातळीवर पोहोचला आहे. तालुक्यातील दोंडाईचा विभागातील संगणक परिचालक यांनी माननीय नामदार जयकुमार रावल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शिंदखेडा तालुक्यातील संगणक परिचालकांच्या मानधनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी रावल यांनी तत्काळ दखल घेत, त्याच ठिकाणी अजित शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धुळे यांना दूरध्वनी करून संगणक परिचालकांचे प्रलंबित मानधन तात्काळ अदा करण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या.
धुळे जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील संगणक परिचालकांचे मानधन वितरित झालेले असताना, केवळ शिंदखेडा तालुक्यातील मानधन का रखडले आहे, असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. अनेक महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने संगणक परिचालक आर्थिक अडचणीत सापडले असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्यांच्यावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
राज्य शासनाच्या विविध ऑनलाईन सेवा, नोंदणी प्रक्रिया, प्रमाणपत्रे व ग्रामपंचायत कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी संगणक परिचालकांचे योगदान महत्त्वाचे असताना त्यांनाच वेळेवर मानधन न देणे ही गंभीर बाब असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
नामदार रावल यांच्या हस्तक्षेपानंतर प्रशासनाकडून लवकरात लवकर कार्यवाही होऊन संगणक परिचालकांचे मानधन वितरित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात येणार असल्याचेही संकेत संगणक परिचालकांनी दिले आहेत.







