
थाळनेर (प्रतिनिधी) – शिरपूर तालुक्यातील थाळनेर गावात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे व्यापक स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ग्रामस्वच्छतेसाठी नागरिकांमध्ये जनजागृती घडवून आणण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने आणि सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अभियानाची सुरुवात ग्रामीण रुग्णालय परिसरातून करण्यात आली. प्रथम ग्रामीण रुग्णालयाचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. त्यानंतर बस स्थानक, पोलीस स्टेशन आवार, भोई गल्ली, नवलपुरा बाजारपेठ तसेच दामशरपाडा या भागांतील मुख्य व अंतर्गत रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली.
प्रतिष्ठानच्या सदस्यांनी हातात झाडू घेत स्वच्छतेचे प्रत्यक्ष उदाहरण घालून दिले. गोळा झालेला कचरा ट्रॅक्टरमध्ये भरून नियोजित ठिकाणी जमा करण्यात आला. “स्वच्छ गाव, निरोगी गाव” हा संदेश देत नागरिकांनाही स्वच्छतेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी शिरपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती विजय बागुल, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. गुलाबराव पाटील, सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील तसेच शिरपूर तालुका कृषी विक्रेता संघटनेचे तालुकाध्यक्ष हेमंत चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
या अभियानामुळे गावात स्वच्छतेबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, अशा उपक्रमांमुळे सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.







