📰 शिंदखेडा आगारात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा; कुसुमाग्रजांना अभिवादन
शिंदखेडा : मराठी साहित्याचे ज्येष्ठ कवी तथा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त शिंदखेडा आगारात मराठी भाषा दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी भाषेचे संवर्धन व जतन करण्याचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मराठी भाषा ही आपल्या संस्कृतीची ओळख असून तिचा दैनंदिन व्यवहारात अधिकाधिक वापर व्हावा, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.
या प्रसंगी आगार प्रमुख योगेशराव शिंदे यांनी मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करत कर्मचाऱ्यांनी शासकीय कामकाजात मराठीचा वापर वाढवावा, असे सांगितले. तसेच मराठी साहित्य आणि संस्कृती जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमास सहाय्यक वाहतूक निरीक्षक, अधिकारी, कर्मचारी तसेच व्हॉईस ऑफ मीडिया शिंदखेडा तालुका पदाधिकारी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन करण्यात आले. मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे आगार परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.







