पालकमंत्री जयकुमारभाऊ रावल यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विकासकामांचा शुभारंभ
वरुळ-घुसरे :- धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे पणन व राज्य शिष्टाचार मंत्री आदरणीय जयकुमारभाऊ रावल यांच्या वाढदिवसानिमित्त वरुळ-घुसरे परिसरात विविध विकासकामांचे शुभारंभ उत्साहात पार पडले.या प्रसंगी विविध मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून नवीन विकासकामांना सुरुवात करण्यात आली.
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या कामांचे उद्घाटन सरपंच,उपसरपंच,कार्यकारी सोसायटीचे सदस्य,ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले. स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त विकासकामांची भेट मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
या अंतर्गत घुसरे येथे जिल्हा परिषद शाळेच्या आवारभिंतीचे बांधकाम व शाळेच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह शैक्षणिक वातावरण सुधारण्यास मदत होणार आहे. तसेच वरुळ येथे मुख्य रस्त्यालगत सोलर स्ट्रीट लाईट बसविण्याचे काम सुरू करण्यात आले असून,यामुळे रात्रीच्या वेळी वाहतूक व नागरिकांच्या सुरक्षिततेत वाढ होणार आहे.
याशिवाय माहाजंबा देवस्थान सुशोभीकरण तसेच गावांतर्गत पीव्हीसी गटार बांधकामाची कामेही मार्गी लागली असून,यामुळे परिसराच्या स्वच्छता व सौंदर्यात भर पडणार आहे.या वेळी उपस्थित मान्यवरांनी पालकमंत्री जयकुमारभाऊ रावल यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात सुरू असलेल्या विकासकामांचे कौतुक करत, भविष्यातही अशाच प्रकारे सर्वांगीण विकास होत राहील, असा विश्वास व्यक्त केला.







