*मीराबाई गर्ल्स हायस्कूलमध्ये ʻ पालक शिक्षक मेळावा ʼ उत्साहात संपन्न*
शिंदखेडा :- येथील मीराबाई गर्ल्स हायस्कूलमध्ये विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये संवाद व्हावा, विद्यार्थ्यांची प्रगती समजावी या उद्देशाने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जे. पी. पाटील उपस्थित होते. व्यासपीठावर संस्थेचे संचालक बाबासो. एम. वाय. पवार, पर्यवेक्षक व्ही. आर. महाले, ज्येष्ठ शिक्षक के. के चौधरी, ए. बी. पाटील, पालक माजी मुख्याध्यापक श्री. परदेशी व महिला पालक व्यासपीठावर विराजमान होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला ईशस्तवन, स्वागतगीत, दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करून मेळाव्यास सुरूवात झाली. मान्यवरांचा व पालकांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक, शाळा यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत पालक शिक्षक समितीचे प्रमुख ए. बी. पाटील यांनी प्रास्ताविकातून मांडले. व्ही. आर. वाघ यांनी मागील पालक शिक्षक सभेचे इतिवृत्त सादर केले. श्रीमती एम. जी. पाटील यांनी शालेय शिस्तीसंदर्भात पालकांची, शिक्षकांची भूमिका व दैनंदिन अभ्यासाबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थी जीवनातील स्पर्धा परीक्षांचे महत्त्व, विविध शिष्यवृत्ती परीक्षा, शाळेच्या विविध योजना याबाबत माहिती सी. एस. पाटील यांनी सांगितली. पर्यवेक्षक व्ही. आर. महाले यांनी शाळेतील भौतिक सुविधा व शालेय प्रगतीचा अहवाल सादर केला. श्री. तुषार सोनवणे, सौ. किर्ती धनगर, अमरसिंग गिरासे, मनोज चौधरी, दरबारसिंग गिरासे, सुनील मोरे, गोरख बिऱ्हाडे, प्रशांत बोरसे, सुरेखा गिरासे या पालकांनी सकारात्मक मनोगते व्यक्त केली. यावेळी पालक शिक्षक सभेची नूतन कार्यकारिणी गठीत करण्यात आली.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक जे. पी. पाटील यांनी सांगितले की, मीराबाई गर्ल्स हायस्कूल ही शहरातील एकमेव मुलींची शाळा आहे. ʻ मासिक चाचणी ʼ, ʻ लर्न ओ मीटर ʼ, ʻ शाळा आपल्या दारी ʼ ʻ कॉपीमुक्त परीक्षा ʼ या नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी पालक शिक्षक समितीचे प्रमुख ए. बी. पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. बी. जगताप यांनी केले. सौ. ए. टी. पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. मेळाव्यास सर्व शिक्षक शिक्षिका बंधुभगिनी, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.