*तलाठी संतोष पवार यांची कार्यालयातच निघृण हत्या प्रकरणी शिंदखेडा तालुका तलाठी संघाच्या वतीने निषेध*
शिंदखेडा प्रतिनिधी भूषण पवार
शिंदखेडा : – आडगाव रंजे ता.वसमत जि.हिंगोली येथे भरदिवसा तलाठी कार्यालयात तलाठी संतोष देवराव पवार यांचा शासकीय कामकाज करत असतांना चाकू भोकसून खून करण्यात आला.महाराष्ट्र सारख्या राज्यात अश्या प्रकारे एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यासोबत खुनाची घटना घडल्याचा प्रकार अत्यंत भ्याड,निंदनीय व घृणास्पद असुन यामध्ये आरोपीची मानसिक विकृती दिसुन येते. या घटनेचा शिंदखेडा तालुका तलाठी संघाच्या वतीने अत्यंत तीव्र ,संवेदनशील व दु:खद भावनेने निषेध व्यक्त करण्यात आला. प्रसंगी शिंदखेडा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की,वास्तविक “फेरफार प्रलंबित असल्याने खुन” अश्या प्रकारच्या बातम्या पसरविल्या जात आहे. मात्र सबंधित व्यक्तीचे कोणत्याही प्रकारचे फेरफार प्रकरण तलाठी यांच्याकडे प्रलंबित नव्हते.केवळ आपल्या कुटुंबातील शेतजमीन नातेवाईक कुणालातरी हाताशी धरून परस्पर त्यांच्या नावावर करून घेतील काय? अश्या संशयावरून आरोपीने मयत दुदैवी तलाठी संतोष देवराव पवार यांचा खून केल्याचे मिळालेल्या माहितीवरून कळते.परंतू चुकीची बातम्या पसरविल्याने यामध्ये विना कारण तलाठी संवर्गाला बदनाम केले जात आहे.ही बाब अन्यायकारक आहे.यामधील खुलासा आपल्या स्तरावरून सुध्दा व्हावा, हे आपक्षित आहे.या घटनेमुळे मयत तलाठी संतोष देवराव पवार यांचे संपुर्ण कुटुंब उद्वस्त झाले असुन केवळ संशयामुळे त्यांचा कोणताही दोष नसतांना आरोपीच्या मानसिकतेमुळेच त्यांना जीव गमवावा लागला.या घटनेमुळे राज्यातील तलाठीच नव्हे तर संपुर्ण सरकारी कर्मचारी यांचे खच्चीकरण झाले असुन कर्मचारी यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.यावेळी तालुक्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आज “एक दिवसीय लक्षवेधी काम बंद” आंदोलन पुकारले आहे.आरोपीला जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न व्हावेत तसेच प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून व तज्ञ/जेष्ठ सरकारी विधीज्ञामार्फत कायद्यानुसार कमाल शिक्षा देण्यात यावी या साठी शासनाकडून प्रयत्न व्हावेत.राज्यातील तलाठीच नव्हे तर संपुर्ण सरकारी कर्मचाऱ्यांच्या भावना विचारात घेऊन योग्य ते संरक्षण देण्याचा प्रयत्न व्हावा व पुन्हा अश्या घटना होऊ नयेत म्हणून सदरचे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीस अत्यंत कठोर शिक्षा देण्यात यावी.कर्मचाऱ्यांना सुरक्षा देण्याबाबत गांभीर्याने विचार व्हावा व संरक्षण मिळावे.भविष्यात त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहा साठी त्यांच्या वारसांना अनुकंपाद्वारे तात्काळ शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावे. यावेळी तालुका तलाठी संघाचे अध्यक्ष एस.बी.गोसावी,सरचिटणीस एस.सोनवणे तसेच तालुका तलाठी संघाचे सदस्य व मंडळ अधिकारी उपस्थित होते.