spot_img
spot_img

भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी संपूर्ण समाजाने स्वदेशीला प्राधान्य देणे गरजेचे – नितीन चौधरी

भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी संपूर्ण समाजाने स्वदेशीला प्राधान्य देणे गरजेचे – नितीन चौधरी

शिंदखेडा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव संपन्न

शिंदखेडा  : – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव शिंदखेडा येथे आज शनिवार दि. ०४ ऑक्टोंबर २०२५ रोजी संपन्न झाला. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या स्थापनेला या विजयादशमीला शंभर वर्ष पूर्ण होत असून स्वाभाविकच त्याचा उत्साह संपूर्ण स्वयंसेवकांमध्ये दिसून येत आहे. संघाच्या या शंभर वर्षाच्या प्रवासात संपूर्ण हिंदू समाजाचे सहकार्य संघाला लाभले आहे. समाजाच्या सहकार्यामुळेच हा शताब्दी प्रवास यथोचित झाला आहे. परंतु संघाचे कार्य अविरत अखंडपणे चालणारे आहे. मातृभूमीला परम वैभवसंपन्न करण्यासाठी सर्वांना सोबत मिळून काम करावे लागणार आहे. त्यासाठी भारत आत्मनिर्भर होणे आवश्यक आहे आणि भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी समाजाने स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य द्यावे लागणार आहे, असे वक्तव्य धुळे विभाग महाविद्यालयीन प्रमुख नितीन पोपटलाल चौधरी यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कार्यवाह विनोद देसले यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन मंडळ चे धुळे जिल्हा समन्वयक बन्सीलाल लाला सोनवणे, सेवानिवृत्त प्राचार्य रजेसिंग धनसिंग राजपूत, तालुका संघचालक, शिंदखेडा डॉ. सुजय डोंगर पवार उपस्थित होते. उत्सवाच्या सुरुवातीला जाधव नगर, भगवा चौफुली शिंदखेडा येथून सुरुवात होऊन छत्रपती शिवाजी चौक, तहसील कार्यालय, गांधी चौक, रथ गल्ली, शनी मंदिर मार्गे संघाचे सघोष पथसंचलन झाले व उत्सवाचा समारोप जनता हायस्कूल, शिंदखेडा या ठिकाणी झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बन्सीलाल सोनवणे व मा प्राचार्य रजेसिंग राजपूत मार्गदर्शन केले. यावेळी संघाचे प्रात्यक्षिकाचे सादरीकरण करण्यात येऊन त्या विषयी उपस्थितांना माहिती करून देण्यात आली.
उत्सवातील प्रमुख वक्ते नितीन चौधरी म्हणाले, “जगभरात अनेक ठिकाणी अशांततेचे व अनिश्चिततेचे वातावरण आहे. सांस्कृतिक आणि राजकीय अस्थिरतेमुळे जगातील अनेक देश ग्रस्त आहेत. अशा परिस्थितीत उत्तरोत्तर प्रगती करणारा आणि बलशाली होणारा भारत जगाचे आकर्षण बनत आहे. त्यासाठी अधिक सामर्थ्यवान होण्यासाठी  पर्यावरणपूरक जीवनशैली, ‘स्व’चा बोध, भेदभाव विरहित समरसमय व्यवहार, नागरिक कर्तव्याचे पालन आणि कुटुंब प्रबोधन हे पंच परिवर्तन आपल्या व्यवहारात आपल्याला आणावे लागणार आहे. आत्मनिर्भर होणे हा भारतासाठी पर्याय नाही, तर अनिवार्यता आहे. त्यासाठी स्वदेशीला प्राधान्य द्यावे लागणार आहे. संघाचे शंभर वर्ष अनेक कार्यकर्त्यांच्या त्याग, बलिदान आणि समर्पणातून साकार होत आहे. समाजाला सोबत घेत संघाने आपली वाटचाल केली व पुढेही ती कायम राहील असे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाचे आभार मयूर पवार यांनी मानले. या उत्सवात नगरातील स्वयंसेवक तसेच समाजबांधव, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!