*महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024*
*उमेदवारांने नामनिर्देशन पत्र दाखल करतांना या सुचनांचे अवलोकन करावे*
धुळे, दिनांक 18 ऑक्टोबर, 2024 (जिमाका वृत्तसेवा) : भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम 15 ऑक्टोबर, 2024 रोजी घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार उमेदवारांना जिल्ह्यातील एकूण पाच विधानसभा मतदार संघासाठी दि. 22 ते 29 ऑक्टोबर, 2024 या कालावधीत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत. नामनिर्देशन पत्र दाखल करणेसाठी सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 अशी वेळ निर्धारित करण्यात आली असून या निर्धारित वेळेत उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल करावयाचे आहे, उमेदवारांनी सुचनांचे अवलोकन करून नामनिर्देशन पत्र दाखल करावेत. असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
*विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवाराची पात्रता -*
1. उमेदवार भारतीय नागरिक असावा.
2. उमेदवाराचे वय 25 वर्षापेक्षा जास्त असावे.
3. उमेदवाराचे नाव महाराष्ट्र विधानसभेच्या मतदार यादीत असावे.
*विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करताना घ्यावयाची दक्षता -*
1. उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र विहीत नमुना ” 2B ” भरावयाचा आहे.
2. उमेदवारास निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे शपथ/दृढकथन करावे लागेल.
3. शपथपत्र नमुना – 26 (प्रथम वर्ग दंडाधिकारी/नोटरी यांच्या समक्ष स्वाक्षरी करून सादर करावा)
4. उमेदवाराने मतपत्रिकेवरील फोटोबाबतचे घोषणापत्र सादर करावे.
5. मतपत्रिकेवर नाव कसे असावे याबाबत उमेदवारांनी लेखी पत्र देण्यात द्यावे.
6. नामनिर्देशनपत्रासोबत जमा करावयाची अनामत रक्कम रूपये 10 हजार, अनु. जाती अथवा अनु.जमाती वर्गातील उमेदवारासाठी रूपये 5 हजार ही रोख स्वरूपात जमा करण्यात यावी.
7. एक उमेदवार जास्तीत जास्त 4 नामनिर्देशनपत्र सादर करू शकेल. तसेच एक उमेदवार दोनपेक्षा जास्त मतदारसंघात अर्ज करू शकणार नाही.
8. उमेदवार मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचा असल्यास एक सूचक तर अमान्यताप्राप्त पक्षाचा किंवा अपक्ष असल्यास एकूण 10 सूचक आवश्यक आहे.
9. राजकीय पक्षांचे उमेदवार यांनी पक्षाने प्राधिकृत केल्याबाबत विहीत सूचना पत्र (AA & BB) (नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या अखेरच्या दिवशी दुपारी 3.00 वाजेपूर्वी निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे जमा करणे आवश्यक आहे)
10.नामनिर्देशनपत्रासोबत सादर करावयाचे विहीत शपथपत्र नमुना 26 मधील सर्व रकाने भरणे आवश्यक. एखादी बाब लागू नसेल तर ” निरंक ” / ” लागू नाही ” असा तपशील नोंदविणे आवश्यक आहे.
11. दिनांक 22 ऑक्टोबर, 2024 पासून संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात नामनिर्देशन पत्र विहीत नमुना ” 2B ” शपथपत्र नमुना – 26 मिळू शकतील.
*उमेदवाराचे मतपत्रिकेवरील छायाचित्राबाबत (फोटो) -*
उमेदवारांनी साधारणत: तीन महिन्याचे आतील कालावधीत काढलेला फोटो निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे नामनिर्देशन पत्रासोबत किंवा जास्तीत जास्त छाननीच्या वेळेपुर्वी देणे आवश्यक आहे. फोटोचा आकार 2cm X 2.5 cm असावा. चेहरा समोर आणि पुर्ण तसेच डोळे उघडे, मागील बाजु पांढ-या रंगाची असावी. फोटो रंगीत किंवा ब्लॅक आणि व्हाईट चालेल. उमेदवारांनी सर्वसाधारण कपडे परिधान केलेले असावेत. कोणताही गणवेश असू नये. टोपी, हॅट व गडद रंगाचा चष्मा टाळावा. फोटोचे मागील बाजूला उमेदवाराची किंवा त्याचा निवडणूक प्रतिनिधी यांची स्वाक्षरी असावी. फोटो सोबत विहीत नमुन्यातील Annex-2 (उमेदवाराचे नाव, पत्ता असलेले आणि सदर फोटो लगतच्या तीन महिन्यांपूर्वी काढलेला असल्याचे घोषणापत्र) असावे. घोषणापत्र नामनिर्देशनपत्रासोबत देण्यात येईल.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी खर्चाची मर्यादा निवडणूक आयोगाने निश्चित करून दिली आहे. त्यानुसार उमेदवारास रूपये 40 लाख इतकी खर्च मर्यादा निश्चित करून देण्यात आली आहे. उमेदवारांने यासाठी स्वतंत्र बॅक खाते उघडणे आवश्यक आहे. निवडणुकीसाठीचा सर्व खर्च या खात्यातून करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी निवडणुकीसाठी केलेल्या खर्चाचा हिशेब ठेवायचा असुन उमेदवारांचे खर्चाचा तपशील तपासणीसाठी विधानसभा मतदार संघनिहाय खर्च निरीक्षक यांची नियुक्ती मा. भारत निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे.
नामनिर्देशन पत्र दाखल करणा-या उमेदवारांनी या सर्व बाबींची नोंद घेऊन नामनिर्देशन पत्र निर्धारित वेळेत दाखल करावयाचे असून नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळी भारत निवड़णूक आयोगाकडून देण्यात आलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावयाचे आहे, असेही जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी म्हटले आहे.