धुळे :– झाशी राणी पुतळाजवळ,श्रीराम ट्रॅव्हल पॉईंट, जुनी महापालिकेजवळ 9 मे, 2024 रोजी सांयकाळी एक महिला दारुच्या नशेत तिच्या सुमारे दीड वर्ष वय बालिकेस इजा पोहचवत असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयास मिळाली. त्यानुसार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गिरीश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सतिष चव्हाण, धुळे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धिरज महाजन यांच्या समन्वयाने पोलीस हेड कॉन्स्टेबल ठाणे अंमलदार डी.एम.साळुंखे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) तृप्ती पाटील, चाईल्ड हेल्पलाईन 1098 चे प्रकल्प समन्वयक प्रतिक्षा मगर, सुपरवाईझर मुकेश महिरे, केसवर्कर संदीप पवार, सखी वन स्टॉप सेंटरचे निलेश कोकणी यांनी त्वरीत घटनास्थळी भेट देऊन तक्रारीची शहानिशा करुन या महिला व बालिकेस ताब्यात घेतले.
त्यावेळी सदर बालिकेला काळजी व संरक्षणाची गरज लक्षात घेता तात्काळ बालकल्याण समिती, धुळे यांच्याशी संपर्क साधून बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा डॉ.उषा सांळुखे, सदस्या सुरेखा पवार यांनी बालिकेला काळजी व संरक्षणाची गरज लक्षात घेता बालिकेस शिशुगृहात दाखल केले आहे. अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गिरीश जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.