शिंदखेडा :- सध्या अल्पवयीन मुलांमध्ये दारूचे प्रमाण वाढत असून आता ते 16 वर्षांपर्यंत खाली आले आहे.अल्पवयीन मुले गावठी दारूच्या आहारी जाऊन मृत्युमुखी पडले आहेत तर काही मृत्युच्या दारात उभे आहेत.किशोरवयीन मुलांमधील मद्यपानाचे वाढते प्रमाण हे भावी तरुण पिढीसाठी धोक्याची घंटा आहे.परीसरात गलोगल्ली गावठी दारूची उपलब्धता अल्पवयीन मुलांचे व्यसनाधीन होण्याचं मुख्य कारण आहे.गल्लीतच दारू उपलब्ध होत असल्याने सूर्योदयापूर्वीच दारुड्यांची लाईन विक्रेत्यांच्या अवैध दारूअड्ड्या समोर लागलेली दिसते.
मित्रपरिवाराचा सहवास आणि दडपण हे एक दारूचं व्यसन लागण्याचं मोठं कारण आहे.अबोल स्वभाव,आत्मविश्वासाची कमतरता,शैक्षणिक अपयश,कौटुंबिक ताणतणाव, प्रेमभंग यामुळे या वयोगटातील मुलं बऱ्याचदा मानसिक नैराश्याची भावना अनुभवतात.मग यातून बाहेर पडण्यासाठी मित्रपरिवाराचा आधार घेतात.सुरक्षित वाटणाऱ्या या मित्रांमध्ये मिसळण्यासाठी म्हणून मुलं दारू पिण्यास सुरुवात करतात. दारूची गल्लोगल्ली होणारी उपलब्धता हे ही या वयोगटातील मुलांचे व्यसनाधीन होण्याचं एक कारण आहे.
शिंदखेडा येथे गल्लोगल्ली (24×7) बेकायदेशीर गावठी दारूचा खुलेआम अवैध धंदा सुरू आहे.अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत तर काही उध्वस्त होण्याच्या पायरीवर आहेत.समाजातील प्रमुख तरुण वर्ग व्यसनाधीन होत आहे,त्यामुळे गावातील अवैध दारू व्यवसायावर कारवाई करून पोलिसांनी तत्काळ छापा टाकून अवैध गावठी दारू जप्त करून त्यावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी अशी मागणी जनतेतून व खासकरून महिला वर्गातून होत आहे.
भूषण पवार,माजी सैनिक