spot_img
spot_img

“कार चालवताना हेल्मेट कुठून आलं?” – नाशिक ट्रॅफिक पोलिसांचा अजब कारभार उघड

“कार चालवताना हेल्मेट कुठून आलं?” – नाशिक ट्रॅफिक पोलिसांचा अजब कारभार उघड

बाईकचा फोटो,कारचा नंबर… 1500 रुपयांचे चलन; जबाबदार कोण?

नाशिक ट्रॅफिक पोलिसांचा अजब कारभार; चौकशीची मागणी,,

शिंदखेडा | प्रतिनिधी

शिंदखेडा ;- नाशिक ट्रॅफिक पोलिसांच्या कारभाराचा एक अजब प्रकार समोर आला असून कार चालकाला हेल्मेट न घातल्याचा दंड ठोठावल्याने संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिंदखेडा येथील प्रा. प्रदीप दीक्षित यांच्या मोबाईल क्रमांकावर दिनांक 10 मार्च 2026 रोजी 1500 रुपयांचे ई-चलन आल्याचा संदेश प्राप्त झाला. हे चलन नाशिक ट्रॅफिक पोलिसांकडून पाठविण्यात आले असल्याचे तपासात समोर आले.

ऑनलाईन तपासणी केली असता या चलनात “विदाऊट हेल्मेट – 1000 रुपये” आणि “फ्लायओव्हर उल्लंघन – 500 रुपये” असा दंड नमूद करण्यात आला होता. विशेष म्हणजे या चलनाची तारीख 8 ऑगस्ट 2023 दाखविण्यात आली आहे.

परंतु प्रा. दीक्षित यांच्या नावावर असलेली MH-15 JH 7561 क्रमांकाची टाटा टिगोर कार त्यांनी 7 सप्टेंबर 2023 रोजी खरेदी केली आहे. त्यामुळे “कार चालवताना हेल्मेट न घातल्याचा दंड कसा काय?” असा सवाल उपस्थित झाला आहे.

आणखी धक्कादायक बाब म्हणजे ऑनलाईन चलनाची प्रत काढली असता त्यात बाईकचा फोटो दिसत असून वाहन क्रमांक MH-15 JE 7561 असा असल्याचे स्पष्ट झाले. तसेच फोटोमधील वाहनचालकही प्रा. दीक्षित नसल्याचे समोर आले आहे.

तरीदेखील ट्रॅफिक विभागाने चलन पाठवताना कारच्या आरसी बुकवरील माहिती वापरून दंडाची नोटीस पाठवली, हा गंभीर निष्काळजीपणाचा प्रकार असल्याचा आरोप केला जात आहे.

या प्रकरणात चलनावर पीएसआय अरुण फकीरा भोसले यांचे नाव नमूद असल्याचेही दिसून येत आहे.

या संदर्भात आंतरराष्ट्रीय व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे शिंदखेडा तालुका अध्यक्ष प्रा. प्रदीप दीक्षित यांनी संताप व्यक्त करत, “ट्रॅफिक विभागाने वाहन क्रमांकाची खात्री न करता चुकीचे चलन पाठवले.अशा निष्काळजी कारभारामुळे वाहनधारकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि MH-15 JH 7561 या वाहनावर दाखल केलेले चलन तात्काळ रद्द करावे,” अशी मागणी केली आहे.

दरम्यान, बाईकचा फोटो आणि कारचा नंबर वापरून दंड ठोठावला जाणे हा ट्रॅफिक व्यवस्थेतील गंभीर त्रुटींचा नमुना असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे नाशिक ट्रॅफिक विभाग या प्रकरणाची दखल घेऊन जबाबदारी निश्चित करणार का, याकडे वाहनधारकांचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!