शिंदखेड्यात भाजपचा ‘जोडे मारो’ आंदोलनातून निषेध
हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर माफी मागावी, कार्यकर्त्यांची मागणी
सिंदखेडा :- अखंड भारताचे दैवत व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी केल्याच्या वक्तव्यावरून शिंदखेडा शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र निषेध नोंदविण्यात आला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आक्षेपार्ह व अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ आमदार कार्यालयाजवळील भगव्या चौकात बुधवारी (दि. १८) सायंकाळी ६ वाजता ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले.
या वेळी कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारत संताप व्यक्त केला. संबंधित वक्तव्याबाबत त्यांनी तात्काळ जाहीर माफी मागावी, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले. मार्गदर्शक स्वीकृत नगरसेवक अनिल वानखेडे तसेच शहराध्यक्ष संजयकुमार महाजन यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या मनोगतात शहराध्यक्ष संजयकुमार महाजन म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असून त्यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. गेल्या चारशे वर्षांपासून शिवछत्रपतींचा आदर्श महाराष्ट्राच्या जनमानसात रुजलेला आहे. अशा महान व्यक्तिमत्त्वाबाबत अवमानकारक विधान करणे हा महाराष्ट्राच्या भावनांवर घाला असल्याचा आरोप त्यांनी केला.
या आंदोलनावेळी गटनेत्या श्रीमती वंदना परमार, उपनगराध्यक्ष उदय देसले, बांधकाम सभापती मनोहर पाटील, पाणीपुरवठा सभापती प्रतिनिधी दादा मराठे, नगरसेवक सुयोग भदाणे, ज्ञानेश्वर सकट, प्रतिनिधी गुलाब सोनवणे, संदीप राजपूत, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले, गोपाल चौधरी, राहुल महिरे, राजेंद्र मराठे, वाय. पी. खैरनार, पंडित फुले, अमोल मोरे, महेंद्र तमखाने, मुकेश बडगुजर, अतुल बोरसे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, या आंदोलनामुळे शिंदखेडा शहरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. संबंधित वक्तव्याबाबत सपकाळ यांची भूमिका काय असणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.







