अंगणवाडी सेविका बनावट नियुक्ती प्रकरण : न्याय न मिळाल्यास औरंगाबाद खंडपीठाचा दरवाजा ठोठावणार
मा.सैनिक श्री.महेंद्र पाटील (सोनू फौजी)
शिंदखेडा: _ तालुक्यातील अंगणवाडी सेविका पदभरतीतील बनावट नियुक्ती पत्रांचा घोटाळा आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभाग, पोलीस प्रशासन व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ठोस कारवाई होत नसल्याने तक्रारदारांनी थेट औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
महिला व बालविकास विभागाच्या अखत्यारित असलेल्या या भरती प्रक्रियेत जाहिरात न काढता, नियमबाह्य पद्धतीने,बनावट शिक्के व खोट्या स्वाक्षऱ्यांच्या आधारे नियुक्ती पत्रे देण्यात आल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात काही अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असूनही अद्याप कोणावरही ठोस कारवाई झालेली नाही, *ही बाब धक्कादायक आहे.
*तक्रारदारांनी तालुका पोलिस स्टेशन, जिल्हा प्रशासन,विभागीय आयुक्त, तसेच स्तरावर लेखी तक्रारी व पुरावे सादर करूनही “चौकशी सुरू आहे”* या पलीकडे काहीही घडलेले दिसत नाही. ही दिरंगाई म्हणजे दोषींना अप्रत्यक्ष संरक्षण देण्याचा प्रकार आहे का, असा प्रश्न आता जनतेतून उपस्थित होत आहे.
अंगणवाडी सेविका पदभरती ही गरीब, कष्टकरी व पात्र महिलांच्या रोजगाराशी थेट जोडलेली प्रक्रिया आहे. अशा संवेदनशील योजनेत भ्रष्टाचार, बनावट कागदपत्रे व आर्थिक फसवणूक होत असेल तर तो केवळ कायद्याचा नव्हे तर सामाजिक न्यायाचा देखील अपमान आहे.तक्रारदारांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर लवकरात लवकर गुन्हा दाखल करून दोषी अधिकारी, मध्यस्थ व लाभार्थ्यांवर कारवाई झाली नाही, तर औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करून न्यायालयीन हस्तक्षेप मागितला जाईल. न्यायालयासमोर सर्व पुरावे, कागदपत्रे व पत्रव्यवहार सादर करून सत्य बाहेर काढण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
प्रशासनाने वेळेत जागे होऊन पारदर्शक चौकशी करावी, अन्यथा न्यायालयाच्या आदेशाने होणारी कारवाई अधिक कठोर व लाजीरवाणी ठरेल,हे निश्चित.
आता प्रश्न एवढाच आहे
प्रशासन स्वतःहून कारवाई करणार की न्यायालय त्यांना तसे करण्यास भाग पाडणार?







