तीन महिन्यांपासून मानधन थकीत घरकुल कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ
महाराष्ट्र राज्य घरकुल कंत्राटी कर्मचारी संघटना (ग्रामीण)
शिंदखेडा:_ महाराष्ट्र राज्य घरकुल कंत्राटी कर्मचारी संघटनेअंतर्गत राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी प्रकल्प संचालक यांना ग्रामपंचायत निवेदन देण्यात आले तसेच दिनांक 21-01-2026 पासून या कर्मचाऱ्यांचे काम बंद सुरू आहे तसेच कर्मचाऱ्यांना मागील तीन महिन्यांपासून मानधन मिळालेले नसल्याने त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. तुटपुंज्या मानधनावर शासनाकडून काम करून घेतले जात असले तरी वेळेवर मोबदला न मिळाल्याने कर्मचाऱ्यांना कर्जबाजारी व्हावे लागत आहे. नियमित मानधन न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मुलांचे शिक्षण, घरखर्च व दैनंदिन गरजा भागवणे कठीण झाले आहे. अनेक कर्मचारी गेल्या दहा वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने सेवा देत असूनही त्यांना आजतागायत कायमस्वरूपी करण्यात आलेले नाही. या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी यापूर्वी हिवाळी अधिवेशनादरम्यान मोर्चाही काढला होता. मात्र शासनाने दिलेल्या आश्वासनांची अद्याप पूर्तता झालेली नाही, असा आरोप संघटनेने केला आहे. घरकुल आवास योजनेंतर्गत विविध योजनांमध्ये काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असतानाच वेळेवर मानधन न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना तात्काळ नियमित करण्यात यावे व दरमहा मानधन अदा करण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य घरकुल कंत्राटी कर्मचारी संघटनेने बेमुदत संपाचा निर्णय घेतला आहे. या संपामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना घरकुल योजनांबाबत मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता असून, यावर प्रशासन काय तोडगा काढते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
शासनाने दिलेल्या आश्वासनांची अद्याप पूर्तता झालेली कर्मचारी संघटनेचा बेमुदत संपाचा इशारा







