शेवाडे अंगणवाडी घोटाळा : दोषींना अभय, पोलिसांची संशयास्पद शांतता!
महिलांची लूट, पोलिस मुग गिळून! शेवाडे अंगणवाडी घोटाळ्यात कारवाई शून्य!
बनावट नियुक्तीपत्रांचा बाजार, पोलिसांचे डोळे मिटलेले!
शेवाडे अंगणवाडी भरती घोटाळा : कारवाईऐवजी पोलिसांची टाळाटाळ!
भ्रष्ट अधिकारी मोकाट, पीडित महिलांचे अश्रू अनुत्तरित!
शिंदखेडा (प्रतिनिधी):
चिमठाणे ;”” तालुक्यातील शेवाडे येथे अंगणवाडी सेविका भरती प्रक्रियेत बनावट शिक्के व बनावट नियुक्तीपत्रांच्या आधारे महिलांची आर्थिक फसवणूक झाल्याचा गंभीर आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला असताना, या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यास शिंदखेडा पोलिसांकडून होत असलेली टाळाटाळ संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
या प्रकरणी महेंद्र गोकुळ पाटील (सोनू फौजी), रा.चिमठाणे, ता.शिंदखेडा यांनी पोलिसांकडे सविस्तर तक्रार अर्ज दाखल केला असून, तक्रारीच्या अवलोकनातून शेवाडे अंगणवाडी सेविका भरतीमध्ये बनावट शिक्क्यांचा वापर करून बनावट नियुक्तीपत्र देत महिलांची आर्थिक फसवणूक झाल्याचे स्पष्ट होत आहे.
या संपूर्ण गैरप्रकारास तत्कालीन बाल विकास प्रकल्प अधिकारी रवींद्र शिवाजीराव मराठे (सध्या सेवानिवृत्त) जबाबदार असल्याचे तक्रारीत ठळकपणे नमूद करण्यात आले आहे.
मात्र, तक्रार अर्जाची प्रत जोडूनही ना गुन्हा दाखल, ना अटक, ना ठोस चौकशी!
यामुळे “पोलीस नेमके कुणाला वाचवत आहेत?” असा संतप्त सवाल जनतेतून उपस्थित होत आहे.
या घोटाळ्यामुळे गरीब महिलांची फसवणूक झाली असताना प्रशासनाची शांतता म्हणजे भ्रष्टाचाराला अभयदान नाही ना? असा थेट आरोप होत आहे. दोषींवर तात्काळ कारवाई न झाल्यास प्रशासनाची प्रतिमा मलीन होणार हे निश्चित आहे.
दरम्यान, पोलिस व प्रशासनाच्या दिरंगाईमुळे संतप्त तक्रारदारांनी दि. २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी, धुळे यांच्या दालनात आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
ही बाब अत्यंत गंभीर असून, एखाद्या नागरिकाला आत्मदहनाचा इशारा द्यावा लागतोय, यावरून व्यवस्थेची अपयश स्पष्ट दिसून येते.
आता सवाल थेट आहे –
तक्रार असूनही गुन्हा दाखल का नाही?
दोषी अधिकाऱ्यावर अटक कधी?
की भ्रष्टांना मोकळे रान देण्याचाच निर्धार आहे?
या प्रकरणात तात्काळ गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून जोर धरू लागली असून, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून दिला जात आहे.







