शिरपूर येथे राधाकृष्ण प्रेम मंदिरासाठी भक्तीचा संकल्प
२४ जानेवारी रोजी संत श्री महेंद्रजी महाराजांच्या अध्यक्षतेखाली भव्य बैठक
शिरपूर :- भगवान श्री राधाकृष्ण यांच्या भक्ती, प्रेम व आध्यात्मिक ऊर्जेचे प्रतीक ठरणारे भव्य राधाकृष्ण प्रेम मंदिर साकारण्यासाठी शिरपूर येथे येत्या शनिवार, दि.२४ जानेवारी २०२६ रोजी भाविकांची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर संस्थान, तामथरे (ता. शिंदखेडा, जि.धुळे) यांच्या वतीने आयोजित ही बैठक सायंकाळी ४.०० वाजता स्व.इंद्रसिंग भाऊसाहेब हॉल, वरझडी रोड, शिरपूर येथे होणार आहे.
या बैठकीस परमपूज्य संत श्री.महेंद्रजी महाराज यांचे पावन अध्यक्षस्थान लाभणार असून, गुजरातमधील सुरत येथील नामांकित उद्योजक श्री.रविशेठ राजपूत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. राज्यातील अत्यंत देखणे व भक्तिभाव जागविणारे राधाकृष्ण प्रेम मंदिर उभारण्याच्या दृष्टीने या बैठकीत मंदिर बांधकामाचा आराखडा,भाविकांचे योगदान,नियोजन व सहकार्य याबाबत सविस्तर चर्चा होणार आहे.
या पवित्र कार्यात शिरपूर शहरासह ग्रामीण भागातील सर्व भाविक भक्त, माता-भगिनी, ज्येष्ठ नागरिक तसेच युवकांचा सहभाग अत्यंत मोलाचा असल्याने सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या दैवी कार्याला हातभार लावावा, असे आवाहन श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर संस्थान, तामथरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.







