“नंदुरबार तालुका पोलिसांची धडक कारवाई; दरोड्यापूर्वीच टोळी हाती!”
दोन इसम आणि एक अल्पवयीन तालुका पोलिसांच्या ताब्यात!”
१ लाख ३० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत; नंदुरबार तालुका पोलिसांची यशस्वी कारवाई
प्रविण चव्हाण नंदुरबार (प्रतिनिधी):
नंदूरबार :- चोरी, जबरी चोरी आणि दरोडे यांसारख्या गुन्ह्यांवर आळा बसावा, या उद्देशाने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना नियमित नाकाबंदी आणि गस्त घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार नंदुरबार तालुका पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पकडून मोठी कामगिरी केली आहे.
दि. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रभारी अधिकारी दिनेश भदाणे यांच्या आदेशानुसार बीट अंमलदार गस्त घालत असताना, भोणे आणि चाकळे गावादरम्यान दोन मोटारसायकली उभ्या आढळल्या. त्यावर बसलेले आणि जवळ दबा धरून बसलेले काही इसम संशयास्पद हालचाली करताना पोलिसांना दिसले. पोलिसांनी वाहन थांबविल्यानंतर दोन जण पळून गेले, तर तीनजणांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत त्यांची नावे राजेश शंकीलाल पवार (३२), विष्णू गुणवंत भोसले (३३), दोघे रा. जामदा, ता. साक्री, जि. धुळे, आणि एक अल्पवयीन बालक अशी समोर आली. त्यांच्या बॅगेची तपासणी केल्यावर दरोड्याच्या तयारीसाठी आवश्यक साहित्य व एकूण ₹१,३०,५००/- किंमतीचा मुद्देमाल मिळून आला.
पुढील चौकशीत आरोपींनी कबूल केले की, ते विविध प्रकारचे लालच — चिल्ड्रेन बँकेच्या नोटा, अमरवेल, मॅग्नेट, चमत्कारी मणी इत्यादी दाखवून बाहेरील राज्यातील नागरिकांना फसवतात आणि नंतर हत्याराच्या धाकाने लुटमार करतात. याच हेतूने ते आज दरोड्याच्या तयारीत असल्याची कबुली त्यांनी दिली.
या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. 381/2025 भा.दं.वि. कलम 310(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
*ही कारवाई* पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी दिनेश भदाणे यांच्या नेतृत्वात पो.उप.नि. सुनील भामरे, पो.हे.कॉ. विनायक सोनवणे, राजेंद्र धनगर, पो.कॉ. अरुण चव्हाण, समाधान बोरसे, चा.पो.कॉ. सुभाष राठोड यांनी केली.







