मालपूर :- बांगलादेशीय अल्पसंख्यांक हिंदूंच्या मानवाधिकार, मालमत्ता आणि जीवांचे संरक्षण करण्याबाबत दोंडाईचा शहरासह ग्रामीण भागातील सकल हिन्दु समाजाने एकत्रित येवुन मंगळवारी वीर शिरोमणी महाराणा प्रताप चौक ते अपर तहसील कार्यालय असा जन आक्रोश मोर्चा काढुन अपर तहसीलदार यांना निवेदन सादर केले. ह.भ.प. परमेश्वर महाराज सुरायकर, ह.भ.प. रामचंद्र महाराज मालपूरकर, ह.भ.प. रविकिरण महाराज यांच्या हस्ते नायब तहसीलदार राजेश घोलप यांनी निवेदन स्वीकारले.
यावेळी सकल हिन्दु समाजाच्या भावना तीव्र होत्या.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, महोदय आम्ही भारताचे प्रबुद्ध नागरीक प्रस्तुत निवेदनाद्वारे आपल्या समोर असे विषद करतो की, गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेश या देशात अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंच्या मानवाधिकार, मालमत्ता आणि जीवांचे हनन झाल्याचे विविध प्रसार माध्यमांमधुन निदर्शनास येते. बांगलादेशात गेल्या काही महिन्यांमध्ये हिंदू मंदिरांवर झालेले हल्ले, तोडफोड त्याचबरोबर हिंदू आबालवृद्ध आणि महिलांवर झालेले अमानवीय अत्याचार आणि त्यात सातत्याने होत असलेली वाढ ही गंभीर बाब असून अशाप्रकारच्या सर्व मानवाधिकारांचे हनन करणा-या वृत्तींना रोखण्यासाठी आपल्या स्तरावरून कार्यवाही व्हावी व अशा कार्यवाहीस आम्ही भारताचे हिंदु आपल्या सोबत ठामपणाने आहोत.
प्रस्तुत निवेदनाद्वारे आम्ही आपल्या हे नजरेस आणत आहोत की, अशाप्रकारे केलेल्या असहिष्णू आणि अमानवीय अत्याचारांमुळे बांगलादेशातील हिंदू समुदाय हा त्रस्त आणि व्यथित असून जगभरातील हिंदू समूदाय याची दखल घेत आहे. बांगलादेशात झालेल्या हया धार्मिक अत्याचारांमुळे बांगलादेशातील हिंदूचे धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात आले आहे आणि हया घटनांमूळे विभिन्न धर्मियांचे सहजीवन धोक्यात आल्याचे आणि बांगलादेश शासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसते.
दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ रोजी इस्कॉन च्या संबंधीत चिन्मय कृष्ण महाराज यांना खोटया गुन्ह्यात अडकवून जबदरस्तीने आणि हिंसात्मक पध्दतीने केलेली अटक ही निंदनीय आणि कुठल्याही शासनास अशोभनीय आहे. सदरील अटकेनंतर बांगलादेशातील हिंदू समाजाने लोकशाही पध्दतीने केलेल्या आंदोलनास हिंसात्मक पध्दतीने आणि अत्याचाराने चिरडण्यात आले. याचबरोबर असेही लक्षात आले आहे की, चिन्मय कृष्ण महाराजांना चित्तागोंग मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे, जिथे त्यांना योग्य तो औषधोपचार आणि शाकाहारी भोजन मिळण्यास जाणीवपूर्वक अडचणी निर्माण करण्यात येत आहेत. ह्या बाबी जागतिक स्तरावर मान्य अशा मानवाधिकारांचे उल्लंघन करणा-या आहेत. चिन्मय कृष्ण महाराजांना ज्या कारागृहात ठेवण्यात आलेले आहे त्याच कारागृहात विविध कट्टर मुस्लिम दहशतवादी संघटना जसे की, हिज्ब उत तहरिर, जमातूल मुजाहिदिन बांगलादेश, हरकत उल जिहाद, अन्सार अल इस्लाम आणि इतर अशाच कट्टरपंथीय आणि अन्य दहशतवादी संघटनांशी संबंधित अतिरेक्यांना ठेवल्याचे समजते. ही बाब अतिशय गंभीर असून चिन्मय कृष्ण महाराजांच्या जिवीतास धोका निर्माण करणारी आहे आणि अशाप्रकारचे कृत्य शासनाने करणे निषेधार्ह आहे, यातून बांगलादेश शासनाच्या हेतूवर शंका निर्माण होते. ह्या अटके नंतर चिन्मय कृष्ण महाराजांच्या इतर दोन सहका-यांनाही अटक केल्याचे आणि शेकडो हिंदू धर्माचार्यांना भारतात येण्यापासून मज्जाव केल्याचे लक्षात येते. अशाप्रकारे शासन स्तरावरून आणि बांगलादेशात असलेल्या बहूसंख्य मुस्लिम कट्टरपंथीयांकडून होत असलेले हिंदूंचे धार्मिक उत्पीडन जगासमोर आलेले आहे.
जनआक्रोश मोर्चात निवेदनातुन केलेल्या मागण्या…
१. हिंदूंच्या धार्मिक स्थळ आणि मंदिरांचे संरक्षण बांगलादेशात स्थित हिंदू समाजाच्या सर्व धार्मिक स्थळांचे आणि मंदिरांचे संरक्षण करण्यासाठी भारत सरकारने कठोर शब्दांमध्ये बांगलादेश सरकारला आपल्या भावना कळवून तात्काळ योग्य ती पावले उचलण्यास आग्रह करावा.
२.हिंदू धर्माचार्यांची सूटका इस्कॉनचे चिन्मय कृष्ण महाराज आणि त्यांचे सहकारी तसेच, इतर हिंदू धर्माचार्यांची केलेल्या बेकायदेशीर अटकेतून तात्काळ सूटका व्हावी अशाप्रकारच्या सूचना भारत सरकारने बांगलादेशातील अंतरिम शासनास कराव्या.
3.हिंदू महिलांवर होणा-या अत्याचारांना प्रतिबंध बांगलादेशात झालेल्या सत्तांतरावेळी आणि त्यानंतर गेल्या कित्येक महिन्यांमध्ये विविध समाजमाध्यमांमधून बांगलादेशातील हिंदू मुली व महिलांवर झालेले अमानवीय अत्याचार आणि त्यांच्या मानवाधिकारांचे हनन समोर आलेले आहे. सदरील अमानवीय अत्याचार आणि मानवाधिकारांचे उल्लंघन तात्काळ थांबवण्यासाठी भारत सरकारने जागतिक स्तरावर ह्यासंबंधी आपले मत जाहीरपणाने प्रदर्शित करावे व अंतरराष्ट्रीय समुदायास याबाबत अवगत करावे.
4.समाज माध्यमे आणि समाजात होत असलेले हिंदूंचे धार्मिक उत्पीडन बांगलादेशात उपरोक्त नमूद अत्याचार आणि मानवाधिकार उल्लंघनाच्या घटनांसोबतच तेथील सामाजिक स्तरावर होत असलेले अल्पसंख्यांक हिंदू समाजाचे धार्मिक उत्पीडन थांबवण्यासाठी योग्य ती पावले उचलणे अत्यावश्यक आहे. याचबरोबर विविध समाज माध्यमांमध्ये (सोशल मिडिया) हिंदू धर्म, हिंदू समाज आणि हिंदू संत यांचे होणारे धार्मिक उत्पीडन तात्काळ थांबवण्यात यावे आणि अशा प्रकारचे कृत्य करणा-या कट्टरता वाद्यांविरोधात योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यासंबंधी भारत सरकारने जागतिक स्तरावर ह्यासंबंधी आपले मत जहीरपणाने प्रदर्शित करावे व अंतरराष्ट्रीय समुदायास याबाबत अवगत करावे.
5.अशाप्रकारे, आम्ही भारतीय हिंदू समाज बांगलादेशात हिंदूवर होत असलेल्या अत्याचारा बद्दल सजग आहोत आणि प्रस्तुत निवेदनाद्वारे आम्ही केलेल्या मागण्या ह्या जागतिक स्तरावर मान्य असलेल्या मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी केलेल्या आहेत. आम्ही भारताच्या नागरीकांनी जागतिक मानवाधिकारांना भारताच्या राज्यघटनेत मुलभूत अधिकार म्हणून मान्यता दिलेली आहे आणि भारतात राहणा-या आणि येणा-या प्रत्येक व्यक्तीच्या मानवाधिकारांचे जतन व्हावे याबद्दल आम्ही जागरूक असतो. यास्तव आम्ही भारताचे हिंदू जागतिक स्तरावर होणा-या हिंदूंच्या मानवाधिकारांचे उल्लंघन गांभीर्याने घेत आहोत आणि बांगलादेशात होत असलेले हिंदूंचे धार्मिक उत्पीडन आणि मानवाधिकारांचे हनन तात्काळ स्वरूपात बंद होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि भारताच्या पंतप्रधानांनी आपल्या स्तरावरून होणा-या बांगलादेशीय हिंदू समाजाच्या संरक्षणासाठी उचलण्यात येणा-या प्रत्येक निर्णयात आम्ही ठामपणे आपल्या सोबत आहोत. सकल हिन्दु समाज असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी ह.भ.प परमेश्वर महाराज, ह.भ.प. रामचंद्र महाराज, ह.भ.प. रविकिरण महाराज यांच्या सह विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, शिव प्रतिष्ठान हिंदु जागरण मंच, शिवजयंती उत्सव समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती,हिंदु जनजागृती मंच, व्यापारी असोसिएशन,गोलरक्षक समिती, हनुमान जयंती उत्सव समिती, श्रीराम नवमी उत्सव समिती, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक आदी दोंडाईचा तालुक्यातील सकल हिन्दु समाज मोठय़ा संख्येने यावेळी उपस्थित होता.