
शिंदखेडा :- तालुक्यातील चिमठाणे परिसरातील निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी माजी सैनिक महेंद्र गोकुळ पाटील (सोनू फौजी) यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन केले. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने व लेखी आश्वासन देण्यात आल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले.चिमठाणे ते साक्री तालुक्याकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी वारंवार प्रशासनाकडे केली होती. याबाबत दि. ४ मार्च २०२६ रोजी महेंद्र गोकुळ पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अर्जही दिला होता. मात्र अपेक्षित कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी निर्माण झाली आणि अखेर रास्ता रोको आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला.शुक्रवारी सकाळी दहा वाजता चिमठाणे येथे आंदोलनाला सुरुवात झाली. या वेळी शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस हेड कॉन्स्टेबल अनंत पवार, प्रशांत पवार तसेच होमगार्ड व महिला होमगार्ड देखील उपस्थित होते.आंदोलनस्थळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पवार, दोंडाईचा येथील डेप्युटी इंजिनियर शिंदे व हेमंत गोसावी उपस्थित झाले. काही वेळ उपस्थित अधिकारी व आंदोलन कर्त्यांमध्ये जोरदार संभाषण झाले आंदोलनकर्त्यांनी सांगितले की या ठिकाणी ठेकेदाराला बोलवा व त्याला सदर रस्ता दाखवा परंतु ठेकेदार आजारी असल्याचे सांगण्यात आले.उपस्थित अधिकाऱ्यांनी महेंद्र गोकुळ पाटील यांना लेखी पत्र देत रस्त्याच्या कामाबाबत माहिती दिली.अधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रानुसार चिमठाणे गावातील काँक्रीट रस्त्यामधील काही भागात पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले असून ब्रुमर मशीनद्वारे रस्त्याची साफसफाई सुरू आहे. लवकरच संपूर्ण रस्ता धुळमुक्त करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.तसेच चिमठाणे ते साक्रीकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही ठिकाणी 20 मिली मीटर जाडीचा पृष्ठभाग खराब झाला असून त्या ठिकाणी डांबरी नुतनीकरण करण्याच्या सूचना कंत्राटदाराला देण्यात आल्या आहेत. डांबर उपलब्ध झाल्यानंतर आठ दिवसांत दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.या लेखी आश्वासनानंतर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मध्यस्थीने महेंद्र गोकुळ पाटील यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.ग्रामस्थांनी प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती व्हावी,अशी अपेक्षा व्यक्त केली.







