लोहगावात वानराला भावपूर्ण श्रद्धांजली; ग्रामस्थांकडून अंत्ययात्रा, १८ मार्चला दशक्रिया
शिंदखेडा : तालुक्यातील लोहगाव येथे प्राणिमात्रांप्रती असलेली संवेदना दाखवणारी अनोखी घटना घडली. काही दिवसांपासून आजारी अवस्थेत गावात फिरत असलेल्या एका वानराचे ८ मार्च रोजी निधन झाले. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात आली.
ग्रामस्थांनी या वानराला मानवी संवेदनांनी निरोप देत सोमवारी (९ मार्च) पारंपरिक पद्धतीने अंत्ययात्रा काढली. बँडच्या साथीने गावातून मिरवणूक काढण्यात आली. या अंत्ययात्रेत लोहगाव व परिसरातील ग्रामस्थ, युवक तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.
अंत्ययात्रेनंतर मिरवणूक तापी नदीकिनारी नेण्यात आली. तेथे विधिवत त्या वानराचे अंत्यसंस्कार करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमासाठी गावातील युवक व ग्रामस्थांनी पुढाकार घेत सहकार्य केले.
दरम्यान, या वानराच्या स्मरणार्थ १८ मार्च रोजी दशक्रिया विधी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. या उपक्रमातून लोहगाव ग्रामस्थांनी प्राणिमात्रांप्रती असलेला जिव्हाळा आणि संवेदनशीलता अधोरेखित केली आहे.







