
प्रतिनिधी _ भूषण पवार
शिंदखेडा : शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर वाढवण्यात आलेल्या विशेष गस्तीदरम्यान शिंदखेडा पोलिसांनी धडक कारवाई करत अवैध विदेशी दारू तस्करीचा मोठा डाव उधळून लावला आहे. तब्बल ७८१ बाटल्या विदेशी दारूसह २ लाख ३९ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अलाणे फाट्यापुढे नाकाबंदी केली होती. यावेळी पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार संशयास्पदरीत्या येताना दिसली. पोलिसांनी थांबण्याचा इशारा दिला असता चालकाने वेगाने पळ काढला.यानंतर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग सुरू केला. शिरपूरहून चिमठाणे मार्गे गुजरात राज्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनाचा थरारक पाठलाग करत पोलिसांनी होळ गावाच्या रेल्वे गेटपर्यंत गाडी गाठत अखेर वाहन अडवण्यात यश मिळवले.झडतीदरम्यान पाच ट्रॅव्हलिंग बॅगमध्ये लपवून ठेवलेल्या ‘रॉयल स्पेशल प्रीमियम व्हिस्की’च्या तब्बल ७८१ सीलबंद बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी अंदाजे ३९ हजार ५० रुपयांची विदेशी दारू आणि सुमारे २ लाख रुपये किंमतीची कार असा एकूण २ लाख ३९ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणी संजय बन्सिगीर गोसावी आणि महेंद्र भिका धनगर या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार अकील पठाण करत आहेत. शिवजयंती निमित्त वाढवलेल्या बंदोबस्तामुळे मोठी बेकायदेशीर तस्करी उघडकीस आली असून, शिंदखेडा पोलिसांच्या या सतर्क कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.







