पाष्टे गावात शिवरायांच्या अश्वारूढ स्मारकाचे भूमिपूजन उत्साहात
शिवरायांचे स्मारक पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान आणि स्वराज्याच्या विचारांचे प्रतीक ठरेल – पणन मंत्री मा.आ.जयकुमार रावल
शिंदखेडा : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिंदखेडा तालुक्यातील पाष्टे येथे शिवरायांच्या भव्य अश्वारूढ स्मारकाच्या भूमिपूजनाचा ऐतिहासिक सोहळा उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.
गावात छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी स्मारक उभारावे, ही ग्रामस्थांची अनेक वर्षांची प्रबळ इच्छा होती. सरपंच मोतीलाल नाना वाकडे यांच्या पुढाकारातून तसेच ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे या संकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. स्मारक उभारणीसाठी आवश्यक असलेल्या सर्व शासकीय परवानग्या पूर्ण झाल्याने स्मारक उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
शिवजयंतीचे औचित्य साधत गावातील ११ जोडप्यांच्या हस्ते विधीवत भूमिपूजन करण्यात आले. या अनोख्या उपक्रमातून सामाजिक एकात्मता, समता आणि सामूहिक सहभागाचा संदेश देण्यात आला. संपूर्ण गावात शिवमय वातावरण निर्माण झाले होते.
लवकरच उभारण्यात येणारे हे भव्य अश्वारूढ स्मारक गावाच्या वैभवात भर घालणारे ठरणार असून, पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान आणि स्वराज्याच्या विचारांचे प्रतीक ठरेल.







