बाभुळदे येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब सखाराम शिंदे यांचे दुःखद निधन
बाभुळदे (ता. शिंदखेडा) |
खान्देशातील सामाजिक, सहकारी व सेवाभावी क्षेत्रात निस्वार्थ कार्याने आपली वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब श्री. सखाराम अर्जून शिंदे यांचे आज बाभुळदे येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने बाभुळदे गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे.
एका छोट्याशा खेड्यात जन्म घेऊन अण्णासाहेबांनी आपल्या प्रामाणिक कर्तृत्वाने व सेवाभावी नेतृत्वाने बाभुळदे गावाचे नाव खान्देशात सन्मानाने उंचावले. संयमी स्वभाव, शांत वृत्ती आणि सेवेला वाहिलेले मन हेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते. ते निस्सीम विठ्ठल भक्त होते. पंढरपूरची वारी, नामस्मरण व भक्ती हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. त्यांच्या आचरणातून श्रद्धा व सेवा यांचा सुंदर संगम नेहमीच अनुभवास येत असे.
सहकार महर्षी अण्णासाहेब पी. के. पाटील यांचे ते खंदे समर्थक होते. सहकार, समाजकारण व लोकहिताच्या कार्यासाठी त्यांनी कायम सकारात्मक व ठाम भूमिका घेतली. प्रसिद्धीपासून दूर राहून, कोणताही दिखावा न करता समाजाचे भले व्हावे, हीच त्यांची अखंड तळमळ होती.
आज अण्णासाहेबांचे देहावसान झाले असले, तरी त्यांनी दिलेला सेवाभाव, नीतिमूल्ये आणि सामाजिक बांधिलकीचा वारसा सदैव प्रेरणादायी राहील, अशी भावना ग्रामस्थ व हितचिंतकांतून व्यक्त होत आहे.
अण्णासाहेबांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक व मोठा आप्तपरिवार आहे.
त्यांचा अंत्यविधी उद्या बुधवार, दि. 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता बाभुळदे (ता. शिंदखेडा, जि. धुळे) येथे होणार आहे.
ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो, अशी सर्वत्र प्रार्थना व्यक्त होत असून शोकाकुल कुटुंबीयांप्रती भावपूर्ण संवेदना व्यक्त करण्यात येत आहेत.







