म्हसावद येथे बेकायदेशीर गांजाच्या लागवडीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
!
९ लाख ८३ हजार ४७० रुपयांचा ९८ किलो ३४७ ग्रॅम गांजाचा मुद्देमाल जप्त
नंदुरबार (प्रतिनिधी – प्रविण चव्हाण):
शहादा:- जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या विरोधात निर्णायक पावले उचलत नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने म्हसावद परिसरात मोठी कारवाई करत एकूण ₹९,८३,४७० किंमतीचा ९८ किलो ३४७ ग्रॅम गांजाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, म्हसावद पोलीस ठाणे हद्दीत जुनी पिंप्राणी शिवारात एक इसम बेकायदेशीररित्या गांजाची लागवड करत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तत्काळ कारवाई केली.
पथकाने संशयित इसम सुरत्या ऊर्फ सुरसिंग डुगर्या पाडवी (रा. जुनी पिंप्राणी, ता. शहादा) याच्या शेतात पाहणी केली असता, कापसाच्या पिकात गांजा सदृश झाडे लागवड करून त्यांची जोपासना करण्यात आली असल्याचे आढळले. सदर ठिकाणावरून ९८ किलो ३४७ ग्रॅम वजनाचा, ₹९.८३ लाख किंमतीचा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला.
प्राथमिक चौकशीत हे स्पष्ट झाले की, आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारा गांजा या प्रतिबंधित अंमली पदार्थाची लागवड केली होती. त्यानुसार म्हसावद पोलीस ठाण्यात गु.र.नं. 212/2025 नोंदवून त्याच्याविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, 1985 चे कलम 20(अ)(ब), 22(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पो.उप.नि. मुकेश पवार,पो.उप.नि विकास गुंजाळ, असई राकेश वसावे, तसेच पो.हे.कॉ. दिनेश चित्ते, जितेंद्र पाडवी, सुनील येलवे, पुरुषोत्तम सोनार, सचिन वसावे, पो.ना. दीपक वारुळे, विकास कापुरे, पो.शि. रामेश्वर चव्हाण आणि अभिमन्यु गावित यांच्या संयुक्त पथकाने केली.







