राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त शिंदखेडा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन – विभाग व्यवस्था प्रमुख संजय चौधरी यांची माहिती
शिंदखेडा प्रतिनिधी भुषण पवार
शिंदखेडा :– राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) शताब्दी वर्षाचे औचित्य साधून शिंदखेडा तालुक्यात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रहिताचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती विभाग व्यवस्था प्रमुख संजय चौधरी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.या वेळी बोलताना संजय चौधरी यांनी सांगितले की, विजयादशमीपासून सुरू होणाऱ्या या कार्यक्रमांद्वारे संघाचे कार्य अधिक व्यापक कसे होईल, समाज संघाशी कसा जोडला जाईल, तसेच हिंदू धर्माबद्दलचे गैरसमज कसे दूर केले जातील यावर भर दिला जाईल. या कार्यक्रमांमध्ये पत्रकार, डॉक्टर, इंजिनियर्स यांच्यासह विविध घटकांना सहभागी करून आरएसएस पंचसूत्री कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. यात सत्व, कुटुंब प्रबोधन, नागरिक कर्तव्य पालन आदी मुद्द्यांचा समावेश असेल.संजय चौधरी यांनी संघाच्या इतिहासावरही थोडक्यात प्रकाश टाकला.त्यांनी सांगितले की, 1992 मध्ये बाबरी मशीद पडल्यावर आरएसएसवर बंदी घालण्यात आली होती. संघाचे कार्य संघ संस्थापक डॉ. हेडगेवार, गुरुजी गोलवलकर, बाळासाहेब देवरस या महान नेत्यांच्या कार्यातून उभे राहिले असून, त्यांच्या विचारांचा प्रभाव आजही देशभरातील कार्यकर्त्यांवर आहे.
आरएसएसच्या कार्यक्षेत्राबाहेर एकूण 37 संघटना कार्यरत आहेत. यामध्ये भारतीय मजदूर संघ – कामगार आणि उद्योजक यांच्यात समन्वय साधणारी संघटना, भारतीय किसान संघ – गोआधारित शेतीला प्राधान्य देणारी संस्था, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद – विद्यार्थ्यांच्या संस्कार व नेतृत्व विकासासाठी कार्य करणारी संघटना यांचा समावेश आहे.
प्रांत स्तरावर 70 संघटना कार्यरत असून,2 लाख सेवा प्रकल्प आहेत महाराष्ट्रात चार प्रांत – देवगिरी, खानदेश, विदर्भ, आणि पश्चिम महाराष्ट्र असे विभाग आहेत. सध्या देशभरात 2 लाखांहून अधिक सेवा प्रकल्प सुरू आहेत. यात शिक्षण, आरोग्य, व्यावसायिक मार्गदर्शन, महिलांसाठी शिवणकाम, हस्तकला आणि विविध कौशल्यविकास प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांसाठी लागणारा निधी समाजातूनच स्वीकारला जातो, असे त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेस तालुका संघचालक डॉ. पवार, कल्याणजी, मयूर पवार, राजेंद्र मराठे, तसेच व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघ आणि तालुका मराठी पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते.या कार्यक्रमांतून संघाचे कार्य व्यापक पातळीवर पोहोचवून समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जाईल, असे संजय चौधरी यांनी सांगितले.
शताब्दी वर्षाचे विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार
शताब्दी वर्षात शिंदखेडा येथे विजयादशमीला भव्य पथसंचलन, सद्भाव बैठक, धार्मिक उपक्रमांत भजनी मंडळ, कीर्तनकार, प्रवचनकार यांचे एकत्रीकरण, तसेच वस्तीस्तरावर मेळावे आयोजित केले जातील.
————————————
आरएसएसच्या सभांदरम्यान यापूर्वी माध्यमांना थेट माहिती न देता कार्यक्रम पार पडत असत असे विचारल्यावर याबाबत संघाचे विभाग व्यवस्था प्रमुख संजय चौधरी म्हणाले की,पूर्वी संघाच्या कार्यक्रमांबाबत माध्यमांमार्फत माहिती देण्याची पद्धत नव्हती. परंतु, समाजातील विविध घटकांपर्यंत संघाचे विचार, उपक्रम आणि काम पोहोचावे यासाठी पारदर्शकतेने माहिती देणे आवश्यक आहे. त्यामुळे यावेळी पत्रकार परिषदेद्वारे अधिकृत माहिती देण्यात येत आहे.चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्याचे कारण स्पष्ट करताना म्हटले की, “माध्यमांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आमचा संदेश पोहोचवणे ही काळाची गरज आहे. त्यामुळेच हा नवीन पायंडा घालून पत्रकार परिषद घेण्यात येत आहे.”