*प्रेमविवाहात कायद्याने वयोमर्यादा निश्चित करून आई वडिलांची मंजुरी आवश्यक करा – सकल हिंदू समाजाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी*
*सदर मागणी शासनाने लवकर अमलात आणावी अन्यथा आंदोलनाचा इशारा*
प्रतिनीधी – भूषण पवार
शिंदखेडा : – संपूर्ण भारतात 14 फेब्रुवारी रोजी प्रेमी युगुल वेलेंटाइन दिवस साजरा करतात.एकीकडे या दिवसाचे प्रेमी जोडपांच्या जीवनात महत्त्व आहे परंतु यामुळे समाजात कुठेतरी वाईट गोष्टींना चालना मिळत असते असेही निदर्शनास आले आहे. या गोष्टीचे गांभीर्य समजून शिंदखेडा येथील सकल हिंदू समाज सकल मराठा समाज व सुजान नागरिक यांनी व्हॅलेंटाईन दिनी कायद्याने प्रेम विवाहात आई वडिलांची मंजुरी आवश्यक करणे तसेच प्रेमविवाहाची वयोमर्यादा निश्चित करावी यासाठी थेट मुख्यमंत्र्यांनाच शिंदखेडा तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन दिले आहे.निवेदनात म्हटले आहे की,जन्मापासून लेकीला प्रेमाने वाढवीत असलेले आई-वडील तिच्या शिक्षणासाठी मोल मजुरी करून खर्च पुरवितात.परंतु मुलगी वयाचे 18 वर्षे पूर्ण झाल्यावर असमाजिक घटकांसोबत पळून जाऊन विवाह करते,दांपत्याच्या स्वतःच्या जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांमध्ये न्यायालयीन विवाह नोंदणी करण्याच्या सध्याच्या प्रथेमुळे अनेकदा कागदपत्रे लपवली जातात,मुलीला खोटे नाटे आमिष दाखवून जिल्ह्याबाहेर विवाह नोंदणी करण्यात येते,परिणामी मुलगी बळी पडते किंवा पालक आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात.याव्यतिरिक्त, त्यांच्या व्यवसायात व्यस्त असलेल्या पालकांना त्यांच्या मुलींची काळजी घेण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो,ज्यामुळे त्यांना पळून जाण्याचे आमिष देणाऱ्या असामाजिक घटकांकडून त्यांचे शोषण होऊ शकते.पालकांच्या संमतीशिवाय केलेले विवाह राज्यातील गुन्हेगारी दरात योगदान देतात.असे विवाह पालकांच्या संमतीने नोंदणीकृत झाल्यास गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.तसेच असामाजिक घटकांकडून मुलींना पळवून नेऊन,फुस लावून,खोटे नाटे आमिष दाखवून,मुलीच्या आई-वडिलांना विश्वासात न घेता जिल्ह्याबाहेर विवाह नोंदणी केल्याचे प्रमाण वाढले आहे.अशा विवाहानंतर मुलीचे पालक आपल्या मुलीला परिवारातून समाजातून बाहेर काढतात त्यामुळे तिचा संपर्क आई-वडील व परिवाराशी राहत नाही शेवटी तिला प्रेम विवाह केलेल्या नवऱ्यासोबत दिवस काढावे लागतात भविष्यात नवऱ्याने केलेले अत्याचार सहन करत ती मृत्यूला कवटाळू शकते.
अशा प्रेम विवाहात आई-वडिलांची संमती आवश्यक करून प्रेम विवाहाची वयोमर्यादा 25 वर्षा पर्यंत करण्यात यावी.अशी मागणी सकल हिंदू समाज,सकल मराठा समाज,पुरोगामी संघटना,सुजाण नागरिक यांच्या वतीने करण्यात आली आहे.आपल्या भावना शासनापर्यंत लवकर पोहोचवू असे आश्वासन यावेळी तहसीलदार अनिल गवांदे यांनी दिले.
*शिंदखेडा येथील या संघटनांचा होता जाहीर पाठिंबा*
व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघ ,खानदेश रक्षक सेवा मंडळ,साईलीला नगर बहुउद्देशीय मंडळ,महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना,सूर्यवंशी क्षत्रिय मराठा समाज बहुउद्देशीय मंडळ,सूर्यवंशी क्षत्रिय मराठा समाज नवयुवक मंडळ, व्यापारी सांस्कृतिक मंडळ,खानदेशी आजी-माजी सैनिक सेवा महासंघ,क्षत्रिय बडगुजर समाज बहुउद्देशीय मंडळ,आदिवासी एकता परिषद
——————————————
*अन्यथा आंदोलनाचा इशारा*
प्रेमविवाहात कायद्याने वयोमर्यादा निश्चित करून आई वडिलांची मंजुरी आवश्यक करणे बाबत मागणी शासनाने लवकरात लवकर अमलात आणावी अन्यथा सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलनाचा मार्ग निवडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.